नंदुरबार शहरात खळबळ, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
साईमत नंदुरबार प्रतिनिधी
शहरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भयंकर हल्ल्यात २५ वर्षीय तरुणाचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सागर रमेश जाधव (कैकाडी), वय २५, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील मंदाकिनी हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काही वर्षांपासून कार्यरत होता.
फिर्यादी कुणाल सदाशिव मराठे (रा. श्रीजी कॉलनी, नंदुरबार) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदाकिनी हॉटेलचे मालक जय वळवी यांच्या खुनाच्या प्रकरणात कारागृहात असताना हॉटेल सुरू ठेवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच कारणावरून काही तरुणांनी सागर जाधव याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास सागर हा नेहमीप्रमाणे हॉटेलच्या काउंटरवर काम करत असताना काही तरुण तेथे आले. त्यानंतर त्यांनी अचानक सागरवर हल्ला चढवला. लाकडी दांड्याने त्याच्या पोटावर, हातावर आणि डोक्यावर जोरदार मारहाण करण्यात आली. तसेच स्कॅनर मशिन डोक्यावर फेकून मारल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गंभीर जखमी अवस्थेत सागरला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात विक्की राजपूत (रा. परदेशीपुरा, नंदुरबार), कैलास पाडवी (रा. वाघोदा, नंदुरबार), दिपक ठाकरे (रा. नंदुरबार), निलेश उर्फ बंटी वसंत चौधरी (रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) तसेच एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जयंत वळवी यांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या जातीय तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता, या हल्ल्यात त्या घटनेचा संदर्भ देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून मंदाकिनी हॉटेल परिसर तसेच रायसिंगपूर भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
