गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृतीसह मोफत लसीकरण; तज्ज्ञांकडून विद्यार्थिनी व पालकांना मार्गदर्शन
साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी
येथील वरणगावमधील महात्मा गांधी विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र, तपत कठोरा यांच्या विद्यमाने आयोजित एचपीव्ही लसीकरण अभियानांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींना आरोग्याविषयी जागरूक करण्याबरोबरच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’पासून १४ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. प्रशांत जैस्वाल यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. डॉ. हर्षदा तायडे यांनी भारतासह जगभरात वाढत असलेल्या एचपीव्ही लसीकरणाच्या महत्त्वाची माहिती देत जागतिक आरोग्य संघटनेच्या २०३० पर्यंत गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकला.
तसेच डॉ. संगीता पांढरे यांनी स्त्री प्रजनन संस्थेची सविस्तर माहिती देत एचपीव्ही लसीकरणामुळे कर्करोग टाळता येतो, याबाबत विद्यार्थिनींमध्ये प्रभावी जनजागृती केली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला पालकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
या उपक्रमाला प्राचार्य सी. जे. तायडे, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा ठाकूर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. भारती भंगाळे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमास महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजश्री सपकाळे, जयश्री निंबोळकर, देशमुख मॅडम, शिल्पा झोपे, रिता साळुंके आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
“आज घेतलेला एक छोटा निर्णय उद्याचे आयुष्य सुरक्षित करू शकतो,” हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.
