साईमत / ठाणे / प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खासगी क्रिकेट प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे वय ५९ वर्षे असून तो खासगी क्रिकेट कोच म्हणून कार्यरत होता. पीडित मुलींचे वय १२ ते १४ वर्षे दरम्यान आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास आरोपीने एका मुलीशी अयोग्य वर्तन करत चुकीचा स्पर्श केला होता. त्यानंतर अलीकडेच दुसऱ्या मुलीशीही अशाच प्रकारे विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
दुसऱ्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. स्थानिक पातळीवर चौकशी केल्यानंतर आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी बुधवारी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
