
साईमत, जळगाव, प्रतिनिधी,
येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कलश पंकज भैय्या हिची टोरंटो विद्यापीठाने पीयरसन इंटरनॅशनल स्कॉलरशिपसाठी निवड केली आहे. यासाठी जगभरातून ३८ तर भारतातून फक्त ३ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यात जळगावच्या कलशचा समावेश आहे.
जगातील सर्वोत्तम मानले जाणाऱ्या टोरंटो विद्यापीठाच्या पीयरसन स्कॉलरशिप अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. बारावी सायन्सनंतर कलश ही आता कॅनडा येथे चार वर्षे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेऊन संशोधन करणार आहे. या शिष्यवृत्तीत तिला टोरंटो विद्यापीठातर्फे चार वर्षे निवास, भोजन, ट्युशन फी, पाठ्यपुस्तके यासह इतर सर्व सुविधा मोफतपणे दिल्या जाणार आहेत.
भारतीय चलनामध्ये चार वर्षांचा हा खर्च सुमारे अडीच कोटी रुपये इतका असेल, अशी माहिती तिचे वडील आर्किटेक्ट पंकज भैय्या यांनी दिली. कोरोनाच्या काळापासून कलश व तिचा लहान भाऊ देवेश हे दोघे त्यांच्या विविध राज्यातील मित्रांच्या सहकार्याने फ्लाय अर्थात फन लर्निंग युथ या संस्थेद्वारे वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. या कार्यासाठी कलश हिला अमेरिकेतील ‘जॉर्ज बुश पॉईंट् स ऑफ लाईट ’ या संस्थेने सन्मानित केले आहे. ‘अशोका यंग चेंज मेकर्स ’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने देखील कलश हिला गौरवले गेले आहे. अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महिला संघटनेतर्फे ‘किशोरी प्रतिभा सन्मान ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धां परीक्षांमध्ये तिने २५० पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत.


