आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्यांची हालचाल
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ९७ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सोमवारी समुपदेशन पद्धतीने पार पडली. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित या प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले आणि नव्या पदस्थापना जाहीर केल्या. प्रशासनाने पारदर्शकता, समन्वय आणि कर्मचारी हिताचा विचार करून ही प्रक्रिया राबविल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
या बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. बदल्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आल्या. प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांचा समावेश या प्रक्रियेत करण्यात आला.
पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर २ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील १ प्रशासकीय आणि १ विनंती बदली झाली. कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली. वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ प्रशासकीय तर कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.
परिचर संवर्गातील १० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि वाहन चालक संवर्गातील प्रत्येकी १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली. आरोग्य विभागात सर्वाधिक हालचाली झाल्या असून आरोग्य सेवक संवर्गातील ४ प्रशासकीय, १४ विनंती आणि २ आपसी बदल्या करण्यात आल्या.
तसेच आरोग्य सेविका संवर्गातील २१ प्रशासकीय, ११ विनंती आणि १ आपसी बदली करण्यात आली. आरोग्य सहाय्यक पुरुष संवर्गातील ६ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तर आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील २ प्रशासकीय आणि ३ विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.
औषध निर्माण अधिकारी संवर्गातील २ प्रशासकीय आणि ३ विनंती बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा संवर्गातील १ कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली. विविध विभागांतील या बदल्यांमुळे प्रशासनिक समन्वय वाढून कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने समुपदेशन पद्धतीचा अवलंब करून कर्मचाऱ्यांच्या अडचणी, सेवा गरजा आणि मागण्यांचा विचार केला. बदल्यांमध्ये पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न झाल्याने कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या.
एकूणच, जिल्हा परिषद अंतर्गत ३९ प्रशासकीय, ५५ विनंती आणि ३ आपसी अशा एकूण ९७ बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यात आल्या असून या निर्णयामुळे प्रशासनिक यंत्रणेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे चित्र आहे.
