लग्नासाठी निघालेल्या महिलांचे दागिने चोरीस
साईमत/ भुसावळ / प्रतिनिधी
शहरातील श्रीराम नगर परिसरातून समोर आलेली एक धक्कादायक घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. बस प्रवासादरम्यान तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम नगर परिसरातील दोन महिला शनिवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता रावेर येथे होणाऱ्या लग्नसमारंभासाठी निघाल्या होत्या. त्या भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ–रावेर बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची जाणीव होताच दोन्ही महिलांनी तातडीने भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून बस स्थानक परिसरातील तसेच मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. संशयित चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रवासादरम्यान दागिने व मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
