चाळीसगावला शिक्षकांसाठी दुसरे वाचन, लेखन प्रशिक्षण

0
17

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील राजपूत मंगल कार्यालयात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन व भूजल अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन, लेखन प्रशिक्षणाचे आयोजन केले हेोते. चाळीसगाव तालुक्यातील ३२ शाळांमध्ये वाचन व लेखन हा ९० दिवसांचा उपक्रम आखण्यात आला. उपक्रमास ६६ दिवस पूर्ण झाले. उपक्रमाअंतर्गत ३२ शाळेतील शिक्षकांसाठी आणि चाळीसगाव तालुक्यातील भडगाव, पाचोरा तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले होते.

अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांची औपचारिकता, शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी कुणाचे आदेश नसल्यावरही रविवारच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत साधारण ४०० शिक्षकांनी वाचन व लेखन उपक्रमाचे प्रशिक्षण घेतले. शिक्षकांची मेहनत आणि तळमळ भारावून टाकणारी होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण बाबर, सोलापूर यांनी दोन सत्रात शिक्षकांना वाचतांना व लिहितांना कृतीयुक्त शिक्षणाचा अवलंब कसा करायचा त्याचे तब्बल चार तास प्रशिक्षण दिले. दीड महिन्यात विद्यार्थ्यांना वाचन लेखन कसे येते, याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचा उपस्थित सहभागी सर्व शिक्षकांनी लाभ घेऊन उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी जि.प. चे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह सर्व उपस्थित शिक्षकांनी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचा खेळीमेळीच्या वातावरणाचा अनुभव घेतला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सहयोग ग्रामोदय व भुजल अभियानाचे प्रमुख गुणवंत सोनवणे, जि.प.प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विकास पाटील उपस्थित होते.

गुणवंत सोनवणे यांनी शिक्षकांना संबोधित करतांना चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तालुक्यातील शिक्षकांच्या तळमळीमुळे भविष्यात खुप चांगला असणार आहे. चाळीसगाव तालुक्याचे शैक्षणिक उपक्रमाचे मॉडेल जिल्ह्यातच नाही तर राज्यभर आदर्श असे असणार, असा आशावाद प्रकट केला. त्यांच्या संकल्पनेनुसार चाळीसगाव तालुक्यातील ३२ शाळांमध्ये वाचन व लेखन हा ९० दिवसांचा उपक्रम आखण्यात आला आहे. उपक्रमाच्या अंतर्गत तालुक्यातील शिक्षकांसाठी दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले होते. हा उपक्रम उरलेल्या इतर शाळांमध्ये राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.

शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी उपस्थित शिक्षकांची रविवारची सुट्टी असतांनाही मोठ्या प्रमाणात असलेली संख्या पाहून आश्‍चर्य व्यक्त करत कौतुकही केले. प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी होईल. आजच्या प्रशिक्षणानिमित्त ३२ शाळेत वाचन/लेखन उपक्रम राबविणाऱ्या आदर्श ४८ शिक्षकांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व १ वृक्ष भेट देवून गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख, भूजल अभियान दिंडी प्रमुख सोमनाथ माळी, दयाराम सोनवणे, किशोर शेवरे, अशोक नाना आमले, विकास राठोड उपस्थित होते.

काही शिक्षकांनी उपक्रमाचे सुभाष देसले पाचोरा, अनिता मोरे, सयोगिता शुक्ला यांनी प्रशिक्षणाविषयी अनुभव कथन केले. सेवा सहयोग ग्रामोदय व भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांचे सुरु असलेले चाळीसगाव तालुक्यातील शैक्षणिक, पाण्यावरील कार्य व उपक्रम अगदी नाविण्यपूर्ण, सर्व सामान्यांना फायदेशीर व आयुष्यात बदल घडवणारे असल्याचे नमूद करत आभारही मानले.

यशस्वीतेसाठी कोअर टीमचे महेंद्रसिंग सिसोदे, सुरेश चव्हाण, नंदलाल साळुंखे, पुष्पा बागुल, सीमा बोरसे, लतिका पाटील, समन्वयक अशोक राठोड, पंकज राठोड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संगीता पाटील तर लतिका पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here