दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा प्रारंभ

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय गेल्या २९ फेब्रुवारी घेतला होता. त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रारंभ आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. येत्या ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होईल. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदान वाढविण्यात आले आहे. त्यात बहुवार्षिक पिके २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर, बागायत १७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर, कोरडवाहू ८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अश्‍या वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी १०० कोटींच्यावर मदत मिळाली आहे. शासन निर्णय झाल्याच्या १५ दिवसांच्या आत मदत वितरित केल्याबद्दल आ.मंगेश चव्हाण यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न

ऑगस्ट २०२१ मध्ये महापुरात घरे, जनावरे, दुकाने, जमीन खरडणे नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना सहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या होत्या, अश्‍या १९ गावातील ५६७ शेतकऱ्यांना ८० लाखा निधी प्राप्त झाला आहे. येत्या आठ दिवसांच्या आत त्यांची नुकसानभरपाई थेट बँक खात्यात जमा होईल. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात आगामी काळात चारा छावणी, पाणी टँकर, शैक्षणिक शुल्क माफी, पीक कर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here