साईमत न्यूज नेटवर्क –
रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, खेड तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरडे गोठलवाडी परिसरात शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रणव प्रताप येसरे (वय १३) असे जखमी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव गुरे राखण्यासाठी मुरडे गोठलवाडी परिसरात गेला होता. त्यावेळी त्याला जंगल परिसरात शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब आढळला. उत्सुकतेपोटी त्याने तो हातात घेतला असता अचानक भीषण स्फोट झाला.
स्फोट इतका तीव्र होता की प्रणवच्या हाताला, छातीला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. स्फोटानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक लॅबचे पथक तसेच बॉम्बशोधक पथकाकडून परिसराची सखोल तपासणी करण्यात येत आहे. परिसरात आणखी स्फोटके लपवून ठेवण्यात आली आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वीही रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिकारीसाठी अशाप्रकारची धोकादायक स्फोटके कोणाकडून आणि कुठून आणली जात आहेत, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
