साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून आ.मंगेश चव्हाण यांनी आपल्या विकासकामांचा झंझावात सुरूच ठेवला आहे. अनेक आवश्यक असणारी विकासकामे मंजूर करून आणत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त कृषी भवन बांधकामासाठी ११ कोटी ६९ लाखांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, चार मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका बीजगुणन केंद्र यांचे कार्यालय एका छताखाली येणार आहे. कृषी भवन मंजूर केल्याबद्दल आ.मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
कृषी भवन शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार : आ.मंगेश चव्हाण
चाळीसगाव तालुक्यातील कृषी विभागाची कार्यालये विखुरलेली होती. तालुकास्तरावरील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीत असणे, कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक होते. कृषी विभागाचा लोकसंपर्क लक्षात घेता, विविध विभाग विखुरले गेल्याने प्रशासकीय आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते सोईचे नव्हते. शिवाय कार्यरत कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर परीरक्षणापोटी निधी द्यावा लागत असल्याने खर्चही वाढत जातो.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याने एकाच छताखाली अद्ययावत कृषी संकुल बांधणे आवश्यक होते. त्यामुळे चाळीसगाव येथे मंजूर कृषी भवन निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी व प्रशासकीय दृष्टीने फायदेशीर ठरेल. तसेच ते आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरेल, असा विश्वास चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.