साईमत न्यूज नेटवर्क –
रायपूर : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील रायपूर येथे घडली. आमानाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम्स रुग्णालयासमोर एका तरुणाला कारने चिरडून ठार करण्यात आले. परमप्रीत सिंह (३४) असे मृत तरुणाचे नाव असून, भरत मंगनानी याच्यावर हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, टाटीबंध येथील रहिवासी परमप्रीत सिंह आणि दुर्ग येथील रहिवासी भरत मंगनानी यांच्यात एम्स रुग्णालयासमोर काही कारणावरून वाद झाला. प्राथमिक तपासात या वादामागे प्रेमप्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमधील वाद वाढल्यानंतर भरत मंगनानी आपल्या कारमध्ये बसून तेथून निघण्याच्या प्रयत्नात होता.
दरम्यान, परमप्रीतने त्याची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतने कार पुढे नेल्याने परमप्रीतला धडक बसली. त्यानंतरही परमप्रीतने कार थांबवण्यासाठी थेट तिच्या बोनेटवर उडी मारली. मात्र, आरोपीने कार न थांबवता ती वेगाने पुढे नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
काही अंतर गेल्यानंतर परमप्रीत कारवरून खाली रस्त्यावर पडला. त्यानंतरही चालकाने वाहन थांबवले नाही. उलट त्याने कार परमप्रीतच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापत झाल्याने परमप्रीतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कारसह तेथून फरार झाला.
हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही प्रत्यक्षदर्शींनी कारचा पाठलाग केला; मात्र आरोपी त्यांच्या हाती लागला नाही. घटनेची माहिती मिळताच आमानाका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात आहे. घटनेच्या वेळी एक तरुणीही घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, तिचीही चौकशी करण्यात येत आहे. दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि या घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला अटक झाल्यानंतर या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे
