अनेर परिसरातील चिमुकले विद्यार्थी धावले स्वतःच्या आरोग्यासाठी

0
3

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील दि चोपडा पीपल्स को.ऑप बँक लि. चोपडा, सार्वजनिक सेवा ट्रस्ट चोपडा आणि घोडगाव येथील एस.एन.आर.जी.इंग्लिश मीडियम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने घोडगाव ते कुसुंबे मॅरेथॉन स्पर्धेचे अनेर परिसरातील इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी, ४ मार्च रोजी आयोजन केले होते. स्पर्धेत अनेर परिसरातील चिमुकले विद्यार्थी स्वतःच्या आरोग्यासाठी धावले. स्पर्धेत परिसरातील जिल्हा परिषद शाळा गलंगी, वेळोदे, घोडगाव, वाळकी, अनवर्दे, विटनेर येथील विद्यार्थ्यांनी तर घोडगाव हायस्कुल, एस.एन.आर.जी. इंग्लिश मेडीयम स्कुल, गलंगी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ घोडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे प्रतिमापूजन व परिसरातील लहान बालकांना पोलिओ डोस दिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी गावातील पालक व नागरिकांनी उभे राहून स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक वाळकी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी समाधान राजेंद्र भील, द्वितीय क्रमांक घोडगाव सी. बी. निकुंभ हायस्कुलचा मितेंद्र अंतीलाल बारेला तर तृतीय क्रमांक वाळकी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आदित्य गोविंदा धिवर याने पटकाविला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक घोडगाव एस.एन.आर.जी.इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी अर्जुन रघुनाथ पावरा याने पटकाविले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तालुक्यातील गणपूर येथील स्वप्निल ज्ञानेश्‍वर पाटील यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, घोडगावच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वप्नील पाटील यांनी मुलांना अशाच छोट्या छोट्या स्पर्धामध्ये भाग घेऊन स्वतःला तयार करण्यासाठीचा संदेश दिला. मुलांमधील गुण ओळखण्यासाठी अशा स्पर्धाचे आयोजन करावे, असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी सांगितले. यावेळी घोडगाव आणि कुसुंबे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार जगदीश पाठक यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

यावेळी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन, सार्वजनिक सेवा ट्रस्ट व नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य व चोपडा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, संचालक मदन पाटील, निंबा पाटील, रमेश पाटील, खंडेराव सोनवणे, चोपडा पीपल्स बँक व सार्वजनिक सेवा ट्रस्टचे संचालक प्रा. आशिष गुजराथी, सुनील गुजराथी, विनोद पाटील घोडगाव, सतिष पाटील, मणिलाल पाटील कुसुंबे, अरुण सोनवणे वेळोदे, अतुल पाटील, हातेड आरोग्य केंद्राचे डॉ. विवेक जैस्वाल, विकास शिर्के, सी. बी. निकुंभ हायस्कुलचे पर्यवेक्षक वसंत नागपुरे, एस.एन.आर.जी. स्कुलच्या प्राचार्या जेनीफर साळुंके, कल्पेश साळुंके, एस.एन.आर.जी. आय.टी.आय.चे प्रसाद बाविस्कर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here