नवनाथ नगर परिसरात धक्कादायक घटना; आरोपी सराईत गुन्हेगार, पोलिसांचा शोध सुरू
साईमत / नाशिक
सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणावर चॉपरने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील पेठरोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव राहुल कृष्णा राऊत (वय २७, रा. नवनाथ नगर, पेठ रोड) असे आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १८) एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसह नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर (वय २६, रा. नवनाथ नगर) तेथे आला आणि त्याने राहुलकडे सिगारेट मागितली. मात्र, राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार वार केले.
या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (दि. २०) एप्रिल रोजी पहाटे दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
हल्लेखोर रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाच्या प्रयत्नासह घरफोडी, मारामारी आणि दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
