मुंबई:
ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. शिंदे गटात गेलेले नवनवीन खासदार संजय पाटील यांनी केलेल्या ‘बंदुकीच्या’ इशाऱ्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “मी तुझ्या नादाला लागतो चल! शिवसैनिकांना बंदूक दाखवू नकोस, ५० कोटी गिळले ना, मग गप्प बस,” अशा अत्यंत तिखट शब्दांत राऊतांनी संजय पाटलांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे.
५० कोटींचा हिशोब समोर; राऊतांचे गंभीर आरोप
नियमित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर पैशांचे गंभीर आरोप केले. “या गद्दारीचा संपूर्ण हिशोब माझ्याकडे आहे. त्यांच्याकडे १३ तारखेला १५ कोटी आले, १४ तारखेला ५ कोटी आले आणि त्यानंतर त्यांनी दिल्लीतला व्हीप धुडकावला. उरलेले ३५ कोटी नंतर मिळाले. यांचे सर्व व्यवहार ‘ईडी’च्या रडारवर आले होते. सांगू का कोणाला कोणत्या हॉटेलमध्ये ब्लॅकमेल केलं?” असा खळबळजनक दावा राऊतांनी केला.
”मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा केला”
‘मनसेला उमेदवारी द्यायची नव्हती म्हणून माझ्या मुलीला भांडूपमधून उमेदवारी दिली’ या संजय पाटील यांच्या विधानाचाही राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. “मिंधे गटात खोटं बोलण्यासाठी नशेची गोळी देतात. संजय पाटलांनी स्वतःच्या मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा केला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर राजीनामा देतो, इथपर्यंत त्यांची मजल गेली होती आणि या सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत,” असे राऊत म्हणाले.
बंदुकीच्या भाषेवरून गृहमंत्री फडणवीसांना सवाल
संजय पाटील यांनी माध्यमांसमोर ‘माझ्या किंवा माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जाल’ अशी बंदुकीची अॅक्शन करत इशारा दिला होता. यावर संतप्त होत संजय राऊत म्हणाले, “मी भांडूपलाच आहे, बंदूक दाखवतोस साल्या? तुझी झेड प्लस सुरक्षा काढून ये! मिस्टर फडणवीस, राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? गद्दार माणूस शिवसैनिकांना बंदूक दाखवतोय,” अशा शब्दांत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
