योग दिनानिमित्त जळगावात अधिकारी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी मार्ग म्हणून मान्यता मिळालेल्या योगाला जागतिक स्तरावर आज मोठे स्थान प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव शहरात विविध स्तरांवर उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच ‘मेरा युवा भारत, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, ‘मेरा युवा भारत’चे युवा अधिकारी अभिषेक चवरे, गट शिक्षणाधिकारी (पाचोरा) विजय पवार, मनपा प्रशासनाधिकारी खलील शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा खो-खो संघटनेचे शेखर पोळ आपल्या खेळाडूंसह सहभागी झाले होते. तसेच खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरचे खेळाडू व प्रशिक्षक निलेश बाविस्कर, प्रगती शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. शिरसाट व विद्यार्थी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व क्रीडा शिक्षक रंजीत पाटील तसेच विविध विद्यालयांचे खेळाडू, महिला क्रीडा शिक्षक, अधिकारी-कर्मचारी, योग प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा योग प्रशिक्षक चंचल माळी यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक योगसाधना उत्साहात पार पडली. त्यांनी योगाचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य तसेच दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून योगाचे फायदे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. योगाभ्यासानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून उपलब्ध क्रीडा सुविधा व सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संकुलातील आवश्यक सुधारणा व प्रलंबित उणिवा तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या उपक्रमामुळे योगाबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
