पहुरला श्री क्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव

0
3

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पहूर गावात यात्रोत्सव सुरू झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सकाळी श्रीक्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी भाविकांना साबुदाण्याच्या प्रसादाचे वाटप केले.

गेल्या १९ वर्षांपासून श्रीक्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिर येथे शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू आहे. पहुर आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान संगमेश्‍वर महादेव मंदिर सकाळपासूनच गर्दीने फुलले होते. ह.भ.प.रमेश महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव महापुराण कथा पारायण करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिराच्या परिसरातील यात्रेत व्यावसायिकांनी पूजा, प्रसाद, खेळणी, शितपेय, फराळ, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती.

यशस्वीतेसाठी श्री क्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रदीप लोढा, सचिव हरिभाऊ राऊत, विश्‍वस्त अशोक जाधव, किशोर बनकर, माधव घोंगडे, सुरेश राऊत, ईश्‍वर हिवाळे, मयूर करंकार यांच्यासह ग्रामपंचायत पहूर कसबेच्या सरपंच आशा जाधव, पहूर पेठचे सरपंच अबू तडवी यांच्यासह सर्व ग्रामस्थ, भाविक परिवाराचे सहकार्य लाभत आहे. यात्रास्थळी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here