डोक्यात दगड घालून तरुण कामगाराचा खून करुन धाडले ‘यमसदनी’

0
31

एरंडोल तालुक्यातील सावदे प्रचा येथील घटना

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

एरंडोल तालुक्यातील सावदे प्र. चा. गावात एका कामगाराच्या डोक्यात दगड घालून व बैलगाडीचे शिंगाडे मारून त्याचा निर्घृण खून करुन ‘यमसदनी’ धाडल्याची धक्कादायक घटना रविवारी, ११ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. इंदल प्रकाश वाघ (वय २७, रा. सावदे प्र.चा., ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तरुणाचा खून कोणी केला? याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.

सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील सावदे गावातील खदानीत काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, त्याची पत्नी व मुलगी माहेरी गेली होती. शनिवारी रात्री तो घरीच होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नाही. रविवारी, ११ ऑगस्ट रोजी सकाळी सावदे गावातील जॉगिंगला जाणाऱ्या काही तरुणांना सावदे बस स्थानकाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

कुटुंबियांनी केला आक्रोश

याबाबत पाळधी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची माहिती घेतली. इंदल वाघच्या डोक्याच्या डाव्या बाजूला व कानावर गंभीर वार करण्यात आलेले आहेत. तसेच ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी त्याला डॉ. निरंजन देशमुख यांनी सकाळी ८ वाजता तपासून मयत घोषित केले. यावेळेला कुटुंबीयांनी आक्रोश केला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन जाणून घेतली माहिती

याबाबत पाळधी, धरणगाव तसेच एरंडोल पोलीस स्टेशनला पहाटेच्या सुमारास सावदाचे पोलीस पाटील पवार यांनी माहिती दिली. यावेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक पंकज देसले, प्रभारी एपीआय प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविला. तसेच शासकीय रुग्णालयातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here