साईमत जळगाव प्रतिनिधी
दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती. त्याचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता हा असून या औचित्याने शनिवार दि. ६ रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “इनोव्हेशन, आयपीआर अँड हेल्थ केअर” तसेच “स्ट्रेस फ्री लाईफ” या विषयांवर पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले.
पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह यांनी “स्ट्रेस फ्री लाईफ” या विषयावर मार्गदशन करताना नमूद केले की, शरीर तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण असेल तरच सर्व संकल्प तडीस जाऊ शकतात. त्यामुळेच आपणही “स्ट्रेस फ्री लाईफ” जगू शकतो, मुळात जीवनशैलीत बदल झाल्याने आहारातही बदल झालेले दिसून येतात. अनेक जण रेडी टू इट पदार्थ किंवा इन्स्टंट फूड खाणे पसंत करतात. जंक व नॉनव्हेज फूड प्रेमी असाल तर आतापासूनच या आहाराचे सेवन बंद करण्याचा संकल्प करा, ते शक्य नसल्यास किमान असे फूड खाण्याचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प करावा कारण अशा आहारामुळे आरोग्य चांगले राहण्याऐवजी, पोषण मिळण्याएवजी आरोग्यासाठी धोका वाढतोय. बाहेरील तयार पदार्थ किंवा झटपट खाता येणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. परंतु पोषक घटकांचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. त्यामुळे शरीराचे पोषण होण्याऐवजी स्थूलता वाढीस लागते आणि आरोग्य समस्या निर्माण होतात. तसेच प्रत्येक व्यक्तीचा बहुतांश वेळ सध्या लॅपटॉप आणि त्याहि पेक्षा जास्त वेळ मोबाईलमध्ये जातो आहे. गॅझेटच्या अतीवापराचे दुष्परिणाम यावर अनेक संशोधनही झालेले आहेत. त्यातून हेच स्पष्ट झाले की ज्या व्यक्ती गॅझेटचा अतिवापर करतात त्यांचा आजूबांजूच्या व्यक्तीशी असलेला संपर्क तुटतो. मेंदूतल्या तणावाची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यक्ती आक्रमक होते. ज्या व्यक्ती गॅझेटवर अधिकाअधिक अवलंबून असतात त्यांच्यामध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होते अशा लोकांच्या सामाजिक, भावनिक समस्यांमध्येहि वाढ होते. कारण ते घरातच बसून आभासी जगात वावरत असतात. यापासून बचाव करण्यासाठी घराच्या बाहेर पडा, कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवा. तसेच व्यायाम आणि योग या दोन्ही शरीर आणि मन स्वस्थ आणि संतुलित राखतात. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीराची रोगप्रतिकार क्षमता तंदुरस्त राहते. व्यायाम हा रोगप्रतिकारक क्षमता चांगले राखण्याचा प्रभावी उपाय आहे. अर्थात वर्कआउट किंवा व्यायाम म्हटले की जीममध्ये जाऊन काम गाळणे असेच बहुतेकांना वाटते. पण, केवळ जिममध्ये जाणे म्हणजे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल असे नाही. तर जो व्यायाम दिवसातून 30 मिनिटे सलग करू शकता, ज्यामध्ये हृदयाची गती वाढते, श्वसनाची गती वाढते तसेच रक्तदाब वाढतो असा कोणताही व्यायाम करावा पण तो नियमितपणे करावा तसेच पुरेशी झोप घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. पुरेशी झोप ही केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करते असे नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांनी “इनोव्हेशन, आयपीआर अँड हेल्थ केअर” या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हटले कि, वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार आणि गरज दोन्हीही सातत्याने वाढत आहे. आरोग्यसेवेचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी वैदयकीय क्षेत्रात सातत्याने संशोधन गरजेचे असून आरोग्य सेवेतील समस्या ओळखून त्यावर योग्य उपाय शोधून काढण्यासाठी संशोधन महत्वाचे आहे. उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्याचा वापर करता येईल, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा बरा होण्याचा कालावधी कमी कसा करता येईल यासाठी संशोधन करण्याची देखील गरज असल्याचे त्यांनी म्हटले तसेच आरोग्य क्षेत्रातील बौद्धिक संपदा यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी कार्यक्रमाचे समन्वय साधले व आभार व्यक्त केले तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी कौतुक केले.