रानभाज्यांमध्ये मानवी आरोग्यास लाभदायक सर्व प्रकारचे गुणधर्म असतात : जिल्हाधिकारी

0
3

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

मानवी आरोग्याला आवश्यक असणारी खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म फक्त रानभाज्यांमध्ये आढळून येतात. आपल्या संस्कृती, परंपरेतून आलेल्या भाज्या म्हणून आपण रानभाज्यांना ओळखतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल व परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवात केले.

प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, रोटरीच्या सरिता खाचणे, मुनीरा तरवारी, योगेश भोळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यावेळी म्हणाले, निसर्गाकडून भरभरून मिळणाऱ्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. इतर फास्ट फूडपेक्षा प्रत्येक शासकीय कार्यक्रम, बैठकांमध्ये रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ असणे आवश्यक आहे. केळीवरील कुंकंबर मोझॅक, करपा आदी रोगांवर करावयाच्या उपाययोजना व व्यवस्थापन याबाबत जाणीव जागृती करणाऱ्या पोस्टरचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रानभाजी अंबाडीपासून बनवलेले पराठे, फांगची भजी, मशरूमचा वडा आदी अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला. महिला बचतगटांच्या सदस्यांशी ही त्यांनी संवाद साधला.

रानभाज्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

मायादेवी नगरातील रोटरी क्लबच्या प्रांगणात आयोजित या रानभाजी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनापूर्वीच रानभाज्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.उद्घाटनापूर्वीच विक्रेत्यांच्या 25 टक्के मालाची विक्री झाली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत महोत्सवातील संपूर्ण भाजीपाला विकला गेलेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here