मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे हत्यार उपसल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. विधिमंडळात आपणच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर त्याला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. आता शिंदे गट पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सावध पवित्रा घेतला आहे. शिंदे गट पोहचण्यापूर्वीच शिवसेनेने (Shivs) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
शिवसेनेत उभी फूट झाल्यानंतर दोन्ही बाजूने अधिकृत शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्ष दोन्ही बाजुला पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाणार? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एकीकडे धनुष्यबाण आपल्याकडे राहणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हा कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे ठामपणे सांगत आहेत. तर शिंदे गटाकडून चिन्हावर दावा केला जात आहे. त्यांच्याकडून निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पण शिंदे गटाआधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. आमची बाजू जाणून घेतल्याशिवाय पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी ठाकरे यांनी आयोगाकडे केली आहे. शिंदे गटाकडून चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आयोगाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल.
दरम्यान, याबाबत माहिती देताना शिवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले, दोन तृतियांश आमदार फुटले तरी त्यांना गट बनून राहता येत नाही. त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. ते जे सांगत आहेत की आम्ही शिवसेनेतच आहोत, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तो एवढ्या लवकर ठरणार नाही. आमच्या हातून शिवसेनेचे चिन्ह कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही. कारण शिवसेना हा चाळीस आमदारांनी झालेला पक्ष नाही. हा ३६ लाख सदस्यांचा पक्ष आहे. सदस्य संख्येवर पक्ष स्थापन केला जातो. आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर पक्ष स्थापन करता येत नाही. पक्ष हा सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या नोंदणी, सदस्य संख्येवर अवलंबून आहे.