मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत होता. गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले आणि ही परंपरा थांबली. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा न्यायालयीन लढाईनंतर शिवाजी पार्कवर पार पडला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला. यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडूनही पालिकेच्या दादर जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दाखल झाले आहेत. मागील वर्षी मेळाव्याला मैदान देण्यास पालिकेकडून टाळाटाळ झाल्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने पालिकेची प्रशासकीय कार्यवाही चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिकेला ठाकरे गटाला परवानगी द्यावी लागली होती. यंदा शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर व ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख मिलिंद वैद्य यांनी अर्ज दिले असल्याची माहिती आहे.