साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनजवळील गरीबनगर परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून, सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई राबवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने या परिसरातील अनधिकृत घरे, पत्र्याच्या झोपड्या तसेच काही व्यावसायिक गाळे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईत आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकांचा संयुक्त सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध झाला. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याची घटना घडली. या तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईदरम्यान काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सध्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू आहे.
