रायगडच्या लोणेरेमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; लॉजमधील खोलीत निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह, काही तासांत आरोपीला अटक
साईमत / रायगड
रायगड जिल्ह्यातील लोणेरे परिसरात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका लॉजच्या खोलीत २४ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून, तिची धारदार शस्त्राने डोक्यावर आणि शरीरावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे असून ती रायगडच्या वडगाव परिसरातील रहिवासी होती. लॉजमधील खोलीत तिचा मृतदेह आढळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, फॉरेन्सिक पथक आणि विशेष तपास पथकांना पाचारण करण्यात आले. लॉजमध्ये सापडलेल्या काही ओळखपत्रांच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवत काही तासांतच त्याला ताब्यात घेतले. रायगड, रत्नागिरी आणि नवी मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात हत्या, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
स्थानिक बौद्ध समाज संघटनांनी देखील या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. माणगाव बंदचा इशारा देत प्रशासनावर दबाव वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर आरोपीला अटक झाल्याची माहिती दिली असली तरी, पोलिसांच्या अधिकृत घोषणेमध्ये झालेल्या विलंबामुळे स्थानिक पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
तरुणीच्या बहिणीने भावनिक प्रतिक्रिया देत आरोपीला कठोर शिक्षा आणि न्याय मिळण्याची मागणी केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
