‘हिरवांकुर’च्या साथीने न्यायालयाचा परिसर हरित अन्‌ सुंदर करू

0
6

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

रावेर न्यायालयाच्या कक्षेत साकारल्या जाणाऱ्या अनोख्या संकल्पनेचे अनुकरण प्रत्येकाने करावे. त्यामुळे जागतिक पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल. यासोबत न्यायालय परिसर सुंदर, सुशोभित व हरीत व्हावा, या हेतूने नाशिकमधील ‘हिरवांकुर’ फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकार होत असलेले ‘हर घर किसान’ ‘वृक्ष दत्तक’ अभियानात सक्रियपणे सहभाग घेऊ. तसेच ‘हिरवांकुर’च्या साथीने न्यायालयाचा परिसर हरित अन्‌ सुंदर करू, असा मनोदय रावेर तालुका न्यायालयातील मुख्य न्यायाधीश प्रवीण यादव यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित प्रतीकात्मक वृक्षारोपणाच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाझर चंदू बिऱ्हाडे, सीनियर क्लर्क दिनकर इंगळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष बी.डी.निळे, सचिव के.डी.पाटील, सर्व विधीज्ञ, सेवक वृंद व हिरवांकुर टीमचे कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत, शक्तिसिंग सोहनी, डॉ. राजेंद्र आठवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असताना पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय प्रजातीचे आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त वृक्ष लावून न्यायालय परिसर हिरवागार व सुशोभित करण्याचा मानस न्यायाधीशांनी व्यक्त केला. यावेळी हिरवांकुर फाउंडेशन नाशिकचे संस्थापक-अध्यक्ष निलयबाबु शाह, नलिनी शाह, राखी शाह, आर्किटेक्ट किंजल शाह यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून साकार झालेल्या ‘हर घर किसान’ आणि ‘वृक्ष दत्तक’ अभियानाची मुहूर्तमेढ करण्यात आली.

अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी जळगाव ग्रीन सिटी, सामाजिक वनीकरण विभाग व बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ५ जून ते १५ ऑगस्ट अशा सुमारे सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीत महावृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान चालविले जाणार आहे. अभियानाची संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे सुमारे पाचशे वर्ष बारकोडद्वारे फॉलोअप घेण्याची संकल्पना उदयास आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात समाजातील सरकारी, निमसरकारी व खासगी संस्था, मंडळे, बँका आणि व्यक्तींना सोबत घेऊन जन आंदोलन करण्याचा मानस हिरवांकुर फाउंडेशनचा आहे. उपक्रमाचे समाजातील सर्व स्तराकडून कौतुक होत आहे. त्यासाठी अनेक मदतीचे हात लाभत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here