साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून ‘मविआ’ सरकारवर खापर फोडले आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ‘मविआ’वर टीका केली.
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण आता तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
मुंबईत दसरा मेळाव्यासंदर्भात काल एक महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, “आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असे बोलणे झाले होते. त्यानंतर तळेगावमध्ये जवळपास अकराशे एकर जमीनदेखील आम्ही देऊ केली होती. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करणार आहेत. तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू.”