साईमत / नवी दिल्ली
मध्य-पूर्वेत आधीच तणावग्रस्त असलेल्या परिस्थितीत आता जागतिक सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मलक्का सामुद्रधुनीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या Hormuz Strait परिसरात इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे व्यापार मार्ग विस्कळित झाला आहे. त्यातच आता आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे Malacca Strait चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशिया सरकार या अत्यंत वर्दळीच्या सागरी मार्गावर टोल (शुल्क) लावण्याचा विचार करत आहे. इंडोनेशियाचे अर्थमंत्री पुर्बाया युधि सदेवा यांनी याबाबत संकेत देत सांगितले की, जागतिक व्यापारात देशाची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रस्तावांवर चर्चा सुरू आहे.
हा मार्ग इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्या दरम्यान असल्याने तो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाची तुलना Suez Canal आणि Panama Canal यांसारख्या प्रमुख व्यापार मार्गांशी केली जाते.
मात्र या प्रस्तावाला सिंगापूरने तीव्र विरोध दर्शवला आहे. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, हा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सर्व देशांसाठी खुला आणि विनामूल्य राहिला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा टोल किंवा अडथळा स्वीकारार्ह नाही, असे सिंगापूरने ठामपणे सांगितले आहे.
दरम्यान, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात असून, अंतिम निर्णयासाठी अनेक देशांची सहमती आवश्यक आहे. त्यामुळे तो लगेच लागू होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
भारतावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचा सुमारे 55% ते 60% सागरी व्यापार याच मार्गातून जातो. यात LNG, कोळसा, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल यांचा समावेश आहे.
जर या मार्गावर टोल लागू झाला, तर आयात-निर्यात खर्चात वाढ होऊन थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यास भारतासह अनेक आशियाई देशांसमोर नवे आर्थिक आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
