मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची गरज

0
1

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

लोकशाही देशातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुका शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात. परंतु मतदानाचे आकडे पाहता दिवसेंदिवस ही टक्केवारी घसरताना दिसते. त्यामुळे बऱ्याचदा योग्य लोकप्रतिनिधी निवडीसाठी नागरिकांना अपयश येते. तसे होऊ नये, यासाठी म्हणजेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी केले. मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय येथे आयोजित मतदार जनजागृती उपक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रदीप दाणे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर तालुका गटशिक्षणाधिकारी मदन मोरे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या मतदानाचा अधिकार बजवावा. निवडणूक आयोगातर्फे देशातील एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांग तसेच वयोवृद्धांसाठी आवश्‍यकतेनुसार टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात येत आहे. मतदारांना प्रक्रियेमध्ये दिव्यांगांना सहकार्य करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा नागरिकांना शासनातर्फे निवडणूक प्रक्रियेतील योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या माध्यमातून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन तहसीलदार वखारे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार हा खूप मोठा अधिकार आहे. आपले मतदान हे योग्य उमेदवाराला देऊन लोकशाही प्रक्रिया बळकट करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मदन मोरे यांनी केले.

भारत हा देशातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. देशात सर्व जाती धर्माचे, विविध पंथांचे लोक केवळ संविधानामुळेच एकत्र नांदत आहेत. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली सर्वात मोठी देणगी भारतीय संविधान आहे. लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक प्रदीप दाणे यांनी मांडले.

याप्रसंगी निवडणूक लिपिक रवी वानखेडे, सुकळीचे पोलीस पाटील संदीप इंगळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, नंदकिशोर नमायते, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू धनगर, काशिनाथ पाटील, वासुदेव बाविस्कर, नामदेव तायडे, संतोष पाटील, सुनील डाबके, विनोद डाबके, जवान पांडे, जितेंद्र भोई, श्रावण कोळी, गजानन कोळी, सुरेश राठोड, जिजाबराव पाटील, योगेश मिस्त्री, शिवाजी वानखेडे, प्रेमचंद पाटील, संजीव ठाकरे, वसंत पाटील, संजय पाटील यांच्यासह असंख्य पालक, नागरिक उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उचंदाचे केंद्रप्रमुख संजय ठोसर, सूत्रसंचालन उपशिक्षक शरद बोदडे तर आभार उपशिक्षक दत्तात्रय फेगडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here