विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या होणार शक्ती प्रदर्शन ; यांच्यांत रंगणार सामना

0
4

साईमत लाईव्ह

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनंतर आता महाविकास आघाडीनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नाराज आमदारांना सोबत घेत पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आणि भाजपच्या मदतीने थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं. पक्षातील नेत्यानेच घात केल्याने उद्धव ठाकरे दुखावले गेले असून त्यांनी या बंडखोर गटाला धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध न होऊ देता शिवसेनेनं राजन साळवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी सामना रंगणार

भाजपने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ आमदारांचा पत्ता कट करत मुंबईतील आमदार राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे. आम्हाला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे. असं असतानाही महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा पणाला लावत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here