‘निपुण भारत’ अधिक प्रभावी करण्यासाठी सीईओ करिश्मा नायर यांचा थेट व्हिडिओ संवाद
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सोमवारी डोंगर कठोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गाशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. निपुण भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या अध्यापन प्रक्रियेचा आढावा घेताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेची प्रत्यक्ष पडताळणी केली. तसेच शिक्षकांच्या नियोजनाची माहिती जाणून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली.
संवादादरम्यान करिश्मा नायर यांनी शिक्षक राहुल वाणी यांच्याकडून दैनंदिन अध्यापनाचे नियोजन, कृती आराखड्याची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन कशा पद्धतीने केले जाते, याबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर समजून घेत त्यानुसार त्यांना प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांमधून त्यांची संकल्पना स्पष्ट असल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील प्रगतीची पडताळणी करण्यासाठी त्यांना फळ्यावर बेरीजची उदाहरणे सोडविण्यास सांगण्यात आले. लहान संख्यांपासून ते दोन अंकी संख्यांपर्यंतची बेरीज विद्यार्थ्यांनी अचूकरीत्या करून दाखविली. विशेषतः एका विद्यार्थिनीने दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज सहज आणि बिनचूक सोडविल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभावित झाल्या. तिच्या आत्मविश्वासपूर्ण उत्तराचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचाही आढावा घेण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील उतारे वाचून दाखविले. जोडाक्षरयुक्त शब्दांचे स्पष्ट उच्चारण आणि प्रवाही वाचन करणाऱ्या विद्यार्थिनीचे करिश्मा नायर यांनी अभिनंदन केले. ज्या विद्यार्थ्यांना वाचनात सुधारणा आवश्यक होती, त्यांच्यासाठी शिक्षकांनी अधिक सरावावर भर द्यावा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
संवादाच्या शेवटी करिश्मा नायर यांनी शाळेतील अध्यापन पद्धती, शिक्षकांची तयारी आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. निपुण भारत अभियानाचा उद्देश केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे नसून प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञानात सक्षम बनविणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय नियोजन करून सातत्याने काम करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून अशा पद्धतीने नियमित ऑनलाइन शैक्षणिक आढावा घेतला जात असल्याने शाळांमधील अध्यापन अधिक परिणामकारक होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर ठेवला जाणारा हा थेट संवाद आणि देखरेख जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तावाढीसाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
