निकृष्ट कामांची बिले काढलीच कशी? मुख्याधिकारी, अभियंत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीसाठी टपालाद्वारे पाठवले निवेदन
साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी |
नशिराबाद नगर परिषद हद्दीत झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकावे, या मागणीसाठी नशिराबाद येथील सजग नागरिक दीपक भालचंद्र बोंडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना टपालाद्वारे सविस्तर निवेदन पाठवले असून, दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नशिराबाद गावात गेल्या काही महिन्यांत रस्ते काँक्रीटीकरण, गटारी, कंपाऊंड आणि धापे बसवणे यासारखी कोट्यवधींची विकासकामे करण्यात आली. मात्र, ही सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून, शासनाचा पैसा पाण्यात गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. फैजपूर येथील ठेकेदार शेख कलीम शेख सलीम यांनी ही कामे केली आहेत.
गेल्या ५ वर्षांपासून एकाच ठेकेदारावर ‘कृपादृष्टी’ का?
संबंधित ठेकेदाराला गेल्या पाच वर्षांपासून नशिराबाद नगर परिषदेची कामे सातत्याने कशी काय मिळत आहेत? असा गंभीर प्रश्न या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. या ठेकेदाराने केलेल्या सर्व कामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी आणि भविष्यात त्याला कोणतेही शासकीय काम न देता त्याचे नाव काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात यावे, अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.
…तर मुख्याधिकारी, अभियंत्यांवरही गाजणार कारवाईची कुऱ्हाड?
कामे निकृष्ट दर्जाची झाली असतानाही नगर परिषदेच्या संबंधित यंत्रणेने डोळेझाक का केली? असा सवाल आता उपस्थित होत आहे. “निकृष्ट कामे झाली असतानाही ठेकेदाराची बिले कशी मंजूर झाली? नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंता यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यास, त्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी आक्रमक मागणी तक्रारदाराने केली आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाल्यास नगर परिषदेतील मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाधिकारी यावर काय ॲक्शन घेतात, याकडे आता नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.
