व्ही. एच. पटेल विद्यालयाच्या चेअरमनपदी जितेंद्र वाणी

0
25

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालय, श्याम भगवानदास अग्रवाल बालक मंदिर व आनंदा सुपडू वाणी शिशू विकास या शाळा समितीच्या चेअरमनपदी विद्यमान संचालक जितेंद्र आनंदा वाणी यांची बुधवारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी निवड केली. नियुक्तीचे पत्र अग्रवाल यांच्या हस्ते वाणी यांना देण्यात आले. कनकसिंग राजपूत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदावर उंबरखेडे येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कनकसिंग राजपूत यांचीही निवड केली आहे.

पटेल विद्यालयास प्राथमिक शिक्षणाची ६७ वर्षाची परंपरा आहे. शाळेत शिशू विकास ते १ ली ते ४ थीचे वर्ग भरतात. विद्यार्थी पटसंख्या एक हजाराहून अधिक आहे. माफक शुल्कात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञानही दिले जाते. २००६ मध्ये शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला आहे. जितेंद्र वाणी यांचे वडिल कै. आनंदा सुपडू वाणी यांनीही याच शाळेचे ११ वर्ष चेअरमनपद भूषविले आहे. वडिलानंतर जितेंद्र वाणी यांना संधी मिळाल्याने ते काहीसे भावूक झाले होते.

नारायणदास अग्रवाल हे संस्थेत गेल्या ६० वर्षापासून विद्यार्थी केंद्रबिंद, शिक्षक मानबिंदू असा वसा घेऊन नेतृत्व करीत आहे. त्यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली शाळेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे अग्रेसर राहू, अशी ग्वाही वाणी यांनी दिली.

रिक्त संचालकपदी प्राचार्य रवींद्र राजपूत

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी उंबरखेडे येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कनकसिंग राजपूत यांची संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी बुधवारी निवड केली. निवडीचे पत्र अग्रवाल यांनी राजपूत यांना दिले. व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे चेअरमन व योगाचार्य कनकसिंग राजपूत यांचे निधन झाल्याने रवींद्र राजपूत यांची निवड केली. राजपूत यांना शिक्षण क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे.

यांची होती उपस्थिती

निवडीप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर. सी. पाटील, आ.बं. मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, चाळीसगाव महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वारा, मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन ॲड. प्रदीप अहिरराव, एच. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे चेअरमन अशोक बागड, कळंत्री प्राथ. विद्यालयाचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष भोजराज पुंन्शी, संचालक योगेश करंकाळ, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक के.एन.तडवी, मंजुषा नानकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार जिजाबराव वाघ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here