साईमत / पुणे
कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी गारपिटीच्या तडाख्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागात झालेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
आज पुण्यात अलका टॉकीज चौक ते कोथरूडपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. कोथरूड, वारजे, डेक्कन, माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे या भागात पावसासोबत टपोऱ्या गारांचा जोरदार वर्षाव झाला. सायंकाळी अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातही गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. ढगांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बळीराजा या अनपेक्षित हवामान बदलामुळे चिंतेत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे पावसाचा अंदाज तर दुसरीकडे काही भागात ४० अंशांहून अधिक तापमानाची शक्यता असल्याने राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
