पुणे:
राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड (लोणावळा) येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक मोठे वेगळे वळण मिळाले आहे. या हायप्रोफाइल हत्याकांडात आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून एन्ट्री झाली आहे. पीडित अग्रवाल कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलदगती न्यायालय) चालवला जाईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या निष्पाप मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आदेश देत उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या केसचे वकीलपत्र स्वीकारण्यास संमती दर्शवली आहे.
प्रियकरासोबत मिळून रचला होता नवऱ्याच्या हत्येचा कट
आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून होणाऱ्या नवऱ्याला निर्दयीपणे संपवल्याच्या या गुन्ह्यात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तपासाचा चक्रा वेगवान केला असून, आता पोलिसांनी आपला मोर्चा सियाच्या कुटुंबाकडे वळवला आहे. या हत्येच्या कटात आणखी कोणाचा हात होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी थेट सियाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
”लग्नासाठी कोणताही दबाव नव्हता”, सियाच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा
दुसरीकडे, स्वतःच्या मुलीने केलेल्या या भयंकर कृत्यामुळे सियाच्या वडिलांना जबर धक्का बसला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून (ICU) जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले.
माध्यमांशी बोलताना सियाच्या वडिलांनी एक धक्कादायक आणि महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले,
”सियावर या लग्नासाठी घरून कोणताही दबाव नव्हता. तिने स्वतःच्या मर्जीने केतनला पती म्हणून पसंत केले होते. जेव्हा केतनचे स्थळ आले, तेव्हा ती प्रचंड आनंदी होती. तिने फोटो पाहून केतनला पसंत केले होते.”
वडिलांच्या या खुलाशामुळे आता सियाने हे पाऊल का उचलले? आणि लग्नाला संमती देऊनही केतनची हत्या का केली? हा गूढ प्रश्न अधिक गडद झाला आहे.
अॅड. उज्ज्वल निकम यांच्या एन्ट्रीमुळे आता आरोपी सिया आणि चेतनच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. पुरुषांवरील अत्याचाराची आणि क्रूरतेची सीमा पार करणाऱ्या या घटनेत आता संपूर्ण राज्याचे लक्ष पुलीस तपास आणि कोर्टाच्या कारवाईकडे लागले आहे.
