साईमत / जायखेडा
जायखेडा परिसरातील बिजोटे येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, कांदा पीक वाचवण्याच्या धावपळीत एका शेतकऱ्याचा वादळी वाऱ्यात झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बापू सखाराम जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापू जाधव हे आपल्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यासाठी नामपूर येथे गेले होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच अचानक हवामानात बदल झाला आणि अवकाळी पावसाची तसेच वादळी वाऱ्याची चिन्हे दिसू लागली. शेतात काढून ठेवलेले कांदा पीक वाचणार नाही या भीतीने ते तातडीने गावाकडे निघाले.
अनेक महिन्यांच्या कष्टातून उभे केलेले कांदा पीक पावसात भिजू नये म्हणून त्यांनी विवाहसोहळा अर्धवट सोडून शेताकडे धाव घेतली. गुरुवारी दुपारी आखतवाडे रस्त्याने जात असताना अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. धुळीचे लोट आणि विजांच्या कडकडाटासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयासमोरील लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र काही क्षणांतच वादळाचा जोर इतका वाढला की ते झाड मुळासकट उन्मळून थेट त्यांच्या अंगावर कोसळले. या भीषण दुर्घटनेत बापू जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बिजोटे, आखतवाडे आणि परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. “मातीशी नातं जपणारा शेतकरीच निसर्गाच्या कोपाचा बळी ठरला,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक आघात झाला आहे. बापू जाधव यांच्या पश्चात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
