साईमत,जळगाव, प्रतिनिधी
भावा-बहिणीचे पवित्र नाते म्हणून आपल्या संस्कृतीत साजरी होणारी श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन होय. आज या पावन दिनी जळगाव शहरातील शेकडो भगिनींनी आमदार राजूमामा भोळे यांना शहरातील तेली मंगलकार्यालयात रक्षासूत्र बांधून यशासाठी आशीर्वाद दिले. यावेळी सुमारे 300 हून अधिक भगिनी उपस्थित होत्या.यावेळी राजूमामांनी भारतीय संस्कृतीचा पवित्र सण रक्षाबंधनाच्या सर्व भगिनींना शुभेच्छाही दिल्या.
शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी सेवाभाव जोपासून कार्य करणाऱ्या शहर महानगरपालिका दवाखाना विभागात कार्यरत कायम व एनयूएचएम कर्मचारी भगिनी, आशा वर्कर्स भगिनी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजेच ‘अतूट बंधन’ शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासमोरील तेली मंगल कार्यालयातील समाजरत्नअण्णासाहेब आर.टी.चौधरी सभागृहात आयोजिलेला होता.
यावेळी सर्वधर्मीय भगिनींनी राजूमामांना राखी अर्थात रक्षासूत्र बांधून मामांना बळ दिले. कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार राजूमामा यांच्यासह माजी महापौरसीमाताई भोळे, नगरसेविका उज्ज्वलाताई बेंडाळे, गायत्रीताई राणे, समासेविका रेखा वर्मा, दीपक सूर्यवंशी, महेश चौधरी तसेच मारिया सिस्टर जेएनएम, संगीता पाटील, सपना शिंदे, शमिला तडवी, रुबिना खान आदी उपस्थित होते.