नांद्रे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १४ शेळ्या, एक गाय ठार; दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

0
1

साईमत, देऊर (जि.धुळे) : प्रतिनिधी

तालुक्यातील नांद्रे शिवारात बिबट्याने दोन ठिकाणी हल्ला करून १४ शेळ्या व एक गाय ठार केली. तर, बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेतकरी प्रेमचंद रघुनाथ पाटील यांनी शेतात नेहमीप्रमाणे शेळ्या वाड्यात बांधल्या होत्या. वाड्याला तारेचे कुंपण जाळी लावलेली होती. मात्र, मध्यरात्री बिबट्याने जाळी तोडून कुंपणाच्या वरून उडी मारली. बिबट्याने १४ शेळ्या जागीच फस्त केल्या आणि पाच शेळ्या जखमी केल्या. एका बकरीची किंमत पंधरा हजार रुपये असे एकूण दीड लाखाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. अन्य दुसऱ्या घटनेत शेतकरी सुनील मुरलीधर पाटील यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवीत गाय जागीच ठार केली. यात शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नांद्रे शिवारात विहिरीत बिबट्या पडला होता. लागलीच ही घटना झाली. अशा वारंवार घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकांना रात्री पाणी भरण्यासाठी कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वन विभागाने याबाबत गांभीर्य घ्यावे. शेतकऱ्यांना मदत द्यावी. रात्री वन विभागाने या शिवारात गस्त घालावी. नांद्रे भागात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र आहे. यातून या घटना घडत आहेत. एकीकडे पाऊस नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होत आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here