मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी आम्ही लढून शिवसेना पुन्हा उभी करु, असा निर्धार व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात हे त्यांच्यासाठी मोठी कसोटीच ठरणार आहे.
आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला नवसंजीवनी देईल किंवा या निवडणुकीत पराभव झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची वाटचाल ऱ्हासाच्या दिशेने सुरु होईल, असे मत राजकीय स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे.
महानगर पालिकेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणूक उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतील. तब्बल गेल्या तीन दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.२०१४ नंतर भाजपच्या आक्रमकतेपुढे राज्यातील अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेचला हार मानवी लागली. मात्र मुंबई महापालिकेवर शेवटपर्यत शिवसेनेचा भगवा फडकत राहिला. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मोठी टक्कर देत उद्धव ठाकरे यांचा हा बालेकिल्ला फारकाळ सुरक्षित राहणार नाही, याची जाणीव करुन दिली होती.
२०१७ च्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांपैकी ८४ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर भाजपनेही ८२ जागांवर विजय मिळवला होता. यंदा मुंबईतील प्रभाग वाढून २३६ वर गेले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत भाजप शिवसेनेला मोठा धक्का देऊ शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शिवसेनेला मुंबईतील तळागाळापर्यंत संघटनात्मक बांधणीवर जोर द्यावा लागेल. मुंबईतील शिवसेनेच्या शाखा आणि शाखाप्रमुख या निवडणुकीत शिवसेनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.शिवसेना आपल्या शाखांच्या माध्यमातून या निवडणूक जिंकू शकतात. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या संघटनात्मक ताकदीचा वापर करुन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धडा शिकवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .