उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खासदार मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर ठाम; राऊत मात्र नाराज

0
2

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

आज शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री येथे खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत १४ खासदार उपस्थित होते. या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. अशातच या बैठीकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच इतर खासदार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलीच वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. खासदारांच्या मागणीला राऊत यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे. मात्र मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत सर्व खासदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता मातोश्रीवरून रवाना झाले. राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, बैठकीला १८ पैकी ४ खासदार गैरहजर होते. सगळ्या खासदारांनी भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने त्यांच्या बाजूने शिवसेनेने मतदान करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कोणताही वेगळा गट तयार केला जाणार नाही. एकनाथ शिंदे गटात कोण जाणार यावर चर्चा झाली नाही, असेही किर्तीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की द्रौपदी मुर्मु यांना मतदान केले तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होईल यावर काही चर्चा झाली का? त्यावर किर्तीकर यांनी सांगितले यावर कोणतीही चर्चा झाली नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ४० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. तर आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ४ खासदार गैरहजर होते. त्यातच हजर असलेल्या १४ खासदारांनी भाजपसोबत जाण्याची ठाम भूमिका घेतली. खासदारांच्या या भूमिकेमुळे आता ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच येत्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांचं मतदान नेमक कोणाला होतं? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here