दिव्यांगत्व रोखण्यास उडान प्रारंभिक बालविकास केंद्राची मदत होईल : भालचंद्र पाटील

0
24

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

सध्याचे युग दिवसेंदिवस प्रगती करीत असले तरी अद्यापही दिव्यांगत्व रोखणे शक्य नाही. तंत्रज्ञानाने प्रगती केल्याने जन्माच्या अगोदरपासून अपंगत्व कळते. वेळीच उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांगत्व रोखणे किंवा कमी करणे शक्य होते. उडानच्या प्रारंभिक बालविकास केंद्राच्या माध्यमातून हे पुण्यकर्म शक्य होईल, असे प्रतिपादन दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले.

रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान प्रारंभिक बालविकास केंद्राचे लोकार्पण जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन प्रमुख पाहुणे म्हणून स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी, सोयो सिस्टीमचे किशोर ढाके, के.के.कॅन्सचे प्रमुख रजनीकांत कोठारी, लेवा भातृ मंडळाचे पुरुषोत्तम पिंपळे, शिक्षक माध्यमिक पतपेढीचे एस.डी.भिरुड, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ.ए.जी.भंगाळे, समाजकल्याण विभागाचे भरत चौधरी, ओम साई रिअल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, डॉ.गौरव महाजन, डॉ.अविनाश भोसले, निकुंज अग्रवाल, डॉ.अमित वाघदे, डॉ. निखिल पाटील, डॉ.शोएब शेख, डॉ.तृप्ती बढे, डॉ.कोमल सरोदे, डॉ.चंद्रिका भंगाळे, नगरसेविका ऍड.शुचिता हाडा, दिपमाला काळे आदी उपस्थित होते. भालचंद्र पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक करताना डॉ.अविनाश भोसले यांनी, प्रारंभिक विकास केंद्राची जळगाव जिल्ह्याला आवश्यकता असून उडानच्या माध्यमातून ती पूर्ण होणार आहे. नवजात बालकांना काही अपंगत्व असल्यास त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. केवळ जळगाव नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक दिव्यांगांना त्याचा लाभ मिळणार आहे. ० ते ६ वयोगटातील बालकांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ जलद गतीने होत असल्याने त्याच वयात त्यांच्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात, असे डॉ.भोसले यांनी सांगितले.

महापौर जयश्री महाजन यांनी, दिव्यांग मुलांचे संगोपन करताना पालकांची मोठी कसरत होते. उडान शेकडो दिव्यांग मुलांना मायेचा आधार देत असून हे एक दैवी कार्यच आहे. उडानच्या लहानशा रोपट्याचा मोठा वृक्ष होत असून नवनवीन शाखांना पालवी फुटत आहे. दिव्यांगांची सेवा करणे पुण्याचे कार्य असून उडानचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे असल्याचे, महापौरांनी सांगितले.
डॉ.गौरव महाजन यांनी, दिव्यांगत्वबाबत समाजात अद्यापही अनेक समज, गैरसमज आहेत. मूल जन्माला आल्यानंतर त्यात काही व्यंगत्व असल्यास बऱ्याचदा पालकांच्या नजरेतून ते सुटते किंबहुना त्यांना ते ओळखता येत नाही. विशेषतः ० ते ६ वयोगटातील दिव्यांग बालकांना वेळीच योग्य उपचार मिळाल्यास ते बऱ्यापैकी ठीक होऊ शकतात. दिव्यांग बालकांच्या पालकांनी तसेच समाजातील जागरूक नागरिकांनी प्रारंभिक बालविकास केंद्र आणि त्याठिकाणी मिळणाऱ्या उपचार पद्धतीबाबत अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिक जेव्हा स्वतः जनजागृती करतील तेव्हाच समाजातील प्रत्येक दिव्यांगाला त्याचा लाभ मिळेल, असे डॉ.महाजन यांनी सांगितले.

आभार मानताना रुशील फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांनी, उडानचे विविध प्रकल्प आणि प्रारंभिक बालविकास केंद्राच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली. उडान प्रारंभिक बालविकास केंद्र (Early Intervention Centre) चे सविस्तर वर्णन करताना दिव्यांगांसाठी एखादा उपक्रम राबविणे आणि यशस्वीपणे तो पुढे घेऊन जाणे मोठे जिकरीचे काम असते. ते कार्य पार पाडताना समाजातील प्रत्येक घटकांचे सहकार्य लाभते. उडान सुरू करीत असलेल्या ‘प्रारंभिक बालविकास केंद्र’ (EIC) केंद्राला भविष्यात मोठा पल्ला गाठायचा असून त्यासाठी समाजातील दानशूर दाते, स्वयंसेवक यांनी हिरारीने पुढे येणे आवश्यक असल्याचे हर्षाली चौधरी यांनी सांगितले.
सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण चौधरी, आदित्य चौधरी, जयश्री पटेल, महेंद्र पाटील, धनराज कासट, हेतल पाटील, खुशबू महाजन, प्रतिभा पाटील, चेतन वाणी, सिद्धार्थ अहिरे, सोनाली भोई , जयश्री अहिरे, रितेश भारंबे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here