मिळालेल्या माहितीनुसार, ही बस ठाणे येथून पालघरमार्गे बोईसरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ठाणे स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर बस अचानक बंद पडली. चालकाने तपासणी करण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच आग भडकली. इंजिन व डिझेल टाकीजवळ आग लागल्याने ती झपाट्याने संपूर्ण बसमध्ये पसरली.
घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी तत्काळ बाहेर उडी घेत सुरक्षितपणे आपला जीव वाचवला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य केले. मात्र आगीची तीव्रता इतकी होती की काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून केवळ सांगाडा उरला.
या आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिन अतितापामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे वाहनांमध्ये बिघाडाच्या घटना वाढत असून त्याचाच हा परिणाम असू शकतो, असेही बोलले जात आहे.
