हात-पाय धुण्यास गेलेली तीन मुले पाण्यात बुडाली; मुलीला वाचविण्यात यश, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
साईमत /बुलढाणा/न्यूज नेटवर्क
हात-पाय धुण्यासाठी पाण्याच्या काठावर गेलेल्या तीन बालकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते अचानक पाण्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना देऊळगाव माळी (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील कोराडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घडली. यामध्ये शेख अयान (वय १२) आणि शेख आवेद (वय ८) या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला, तर सानिया या मुलीला तिचे वडील शेख आसिफ यांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेत वाचविले. दोन मुलांचा डोळ्यांसमोर बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव माळी परिसरातील कोराडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विहिरीजवळ पाण्याचा खोल खड्डा आहे. या ठिकाणी शेख अयान, शेख आवेद आणि सानिया हे तिघे हात-पाय धुण्यासाठी पाण्याच्या काठावर गेले होते. मात्र, पाण्याची खोली आणि अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे वडील शेख आसिफ यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली.
शेख आसिफ यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सानियाला पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र, अयान आणि आवेद यांचा शोध घेण्यात त्यांना यश आले नाही. आपल्या डोळ्यांसमोर दोन मुले पाण्यात बुडत असल्याचे दृश्य पाहावे लागल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बालकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी आवश्यक साधनसामग्री तसेच प्रशिक्षित बचाव पथक उपलब्ध नसल्याने शोधमोहीम खोळंबली. त्यातच अंधार पडल्याने बचावकार्य आणि शोधमोहीम रात्रभर अडथळ्यांत सापडली. त्यामुळे कुटुंबीयांचा आक्रोश आणि ग्रामस्थांची चिंता वाढली होती.
अवघ्या १२ आणि ८ वर्षांच्या दोन भावंडांचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने देऊळगाव माळी परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून, ग्रामस्थांमध्येही तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. पाणवठे, विहिरी, धरणांचे पाणलोट क्षेत्र आणि खोल खड्ड्यांजवळ लहान मुलांनी जाऊ नये, यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
