एसटीच्या धडकेत दूचाकी स्वार ठार

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

भामरे गावातील मामाच्या घरून निघून चाळीसगावकडे येत असतांना ओझर गावाजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या एसटीने दिलेल्या धडकेत पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी बसचालकाविरुध्द उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सविस्तर असे की, भामरे येथून मामाच्या घरून मोटर सायकलवरून पुन्हा चाळीसगाव येथे येत असतांना चेतन कांताराम पाटील (वय २५) याला चाळीसगाव शहरालगतच्या ओझर गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ चाळीसगावकडून येणाऱ्या नाशिक-पाचोरा बसने (क्रमांक एमएच-०६, एस- ८८९८) समोरून डावीबाजूने धडक दिली. त्यात चेतन पाटील हा बसच्या उजव्या चाकाजवळ अडकला जाऊन बसमध्ये फरफटत गेला. यावेळी त्याच्या पाठीमागून चालत असलेले त्याचे मामा सुभाष पाटील यांनी त्यास घटनास्थळावरुन लागलीच रूग्णालयात हलविले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. चेतन हा चाळीसगाव येथील एमआयडीसीतील भारत रोपवेमध्ये काम करीत होता. त्याचे मूळ गाव पिचर्डे असून तो चाळीसगाव येथील टाकळी प्र.चा. येथील भागात आई -वडिलांसोबत वास्तव्यास होता. त्याचे मामा सुभाष पाटील यांनी पोलिसात दिलेल्या माहितीवरून बसचालक प्रशांत दत्तात्रय पाटील (रा. राणेनगर, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here