महावितरण जळगाव परिमंडलास दोन सुवर्ण पदके

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

वीज कर्मचाऱ्यांसाठी महावितरणच्या वतीने १ ते ४ फ़ेब्रृवारी दरम्यान छत्रपती संभाजी नगर येथे आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. संपूर्ण राज्यभरातून आलेल्या खेळाडू वीज कर्मचाऱ्यांतून जळगांव परिमंडलातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक तर तीन खेळाडूंनी रौप्य पदक पटकावले. स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात जळगांवचा महिला संघ उपविजेता ठरला.
महावितरणच्या जळगाव विभागातील अबरार अशपाक पटेल (वरिष्ठ तंत्रज्ञ) याने १५०० मीटर धावणे स्पर्धेत तर धरणगांव विभागातील भानुदास शंकर वसावे (तंत्रज्ञ) याने कुस्तीच्या १२५ वजनी गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले.

जळगावच्या सावदा विभागातील विजय उत्तम बाहरे (विद्युत सहाय्यक) याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत व याच विभागातील परेश दिगंबर चौधरी याने ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवले. धरणगांव विभागातील योगेश शांताराम मनोरे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यास ६५ किलो वजनी गटातील कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी रौप्य पदक देण्यात आले.

स्पर्धेत जळगाव परिमंडलातील महिला वीज कर्मचाऱ्यांचा खो-खो संघ उपविजेता ठरला. यात जळगावच्या रिना एम. बिश्वास (तंत्रज्ञ – जळगाव नवी पेठ), सपना पी वानखेडे (सावदा विभाग- विद्युत सहाय्यक), संजना महेंद्र पाटील (धरणगाव विभाग- विद्युत सहाय्यक), माधुरी एस भालेराव ((सावदा विभाग- विद्युत सहाय्यक) व प्रिती मिलींद पानपाटील (जळगाव) यांचा समावेश होता. जळगावच्या या उपविजेत्या संघात उर्वरित खेळाडू नाशिक परिमंडलातील होते. जळगाव व नाशिक परिमंडलातील खो-खो खेळाडू एकत्रितरित्या खेळले. सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी अभिनंदन केले.
छत्रपती श्री संभाजी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्दघाटन महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या हस्ते झाले. तर बक्षिस वितरण संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते झाले.
दोन्ही कार्यक्रमास संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, सुहास रंगारी, मुख्य अभियंता डॉ. मुरहारी केळे, कैलास हुमणे, सूंदर लटपटे यांच्यासह मुख्य अभियंते, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जळगाव परिमंडलातून ५५ खेळाडू सहभागी झाले होते. मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या खेळाडू कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी विशाल पिपरे, मुख्य लिपिक गणेश पवार, निम्नस्तर लिपिक प्रिती पानपाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here