आषाढी एकादशीला संत मुक्ताईंचे दर्शन हे माझे भाग्य आदिती तटकरे मुक्ताई चरणी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर संत आदिशक्ती मुक्ताईंचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे, अशा भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या. श्रीक्षेत्र कोथळी आणि मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी मुक्ताई मातेच्या चरणी प्रार्थना केली.
मंत्री आदिती तटकरे या शनिवारी जळगाव येथून मेळघाट, जिल्हा अमरावतीकडे वाहनाने जात असताना सकाळी सुमारे ९ वाजता श्रीक्षेत्र कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिर तसेच मुक्ताईनगर येथील मंदिरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी संत मुक्ताईंचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मुक्ताई मातेची आरती करण्यात आली.
याप्रसंगी संस्थानच्या वतीने मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे तसेच मुक्ताईनगर मंदिरातील विनायक हरणे महाराज यांनी मंत्री आदिती तटकरे यांचा श्रीफळ व संत मुक्ताई चरित्र ग्रंथ देऊन सत्कार केला.
दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री तटकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र ही संत-महंतांची पवित्र भूमी आहे. आषाढी एकादशी हा प्रत्येकाच्या जीवनातील श्रद्धा आणि भक्तीचा महत्त्वपूर्ण क्षण असतो. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आतुर असतात. अशा पवित्र दिवशी संत आदिशक्ती मुक्ताईंचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.”
“मुक्ताई मातेच्या चरणी राज्यातील नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवन लाभावे तसेच राज्य अधिक प्रगत व समृद्ध व्हावे, अशी मनोकामना व्यक्त केली,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख उमेश नेमाडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव देशमुख, माजी उपसरपंच आसिफ बागवान, माजी नगरसेविका बिलकिसबी बागवान, विजय सोनार, ॲड. रमेश हागे यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
दरम्यान, संत मुक्ताई मंदिरातील दर्शनानंतर शहरातील माजी उपसरपंच आसिफ बागवान यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांचा शाल व संत मुक्ताईंची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंत्री तटकरे यांच्या संत मुक्ताई मंदिर भेटीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
