साईमत न्यूज नेटवर्क –
मध्य रेल्वेने दौंड–अजमेर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीची सेवा आता नियमित करण्यात आली असून २२ मे २०२६ पासून ही गाडी नव्या क्रमांकासह साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या निर्णयामुळे पुणे–राजस्थान दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 20992 दौंड–अजमेर साप्ताहिक एक्सप्रेस दर शुक्रवारी रात्री ११.१० वाजता दौंड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता अजमेर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20991 अजमेर–दौंड एक्सप्रेस दर गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता अजमेरहून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.१० वाजता दौंड येथे दाखल होईल.
या गाडीला पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोधरा, दाहोद, रतलाम, नागदा, भवानीमंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर आणि किशनगड या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
गाडीच्या संरचनेत १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2 Tier), ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier), ७ शयनयान (Sleeper), २ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे.
दरम्यान, दिनांक ४ जून २०२६ पासून या गाडीच्या संरचनेत बदल करण्यात येणार असून शयनयान डब्यांची संख्या ७ वरून ५ केली जाईल, तर सामान्य द्वितीय श्रेणी डबे २ वरून ४ करण्यात येणार आहेत.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
