साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा शिरसोली जवळील ‘चंबार दडी’ पाझर तलावात पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ऋषिकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा आपल्या काही मित्रांसोबत शामाफायरच्या पाठीमागील चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. यावेळी “मला पोहता येते” असे सांगून तो तलावात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चेतन पाटील, धनराज गुळवे आणि शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक तीन पट्टीच्या पोहणाऱ्यांनी ऋषिकेशला पाण्यातून बाहेर काढले. त्याला लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
ऋषिकेशचा अवघ्या दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तो रोजंदारीवर हातमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. घरातील कमावता तरुण मुलगा अचानक निघून गेल्याने कचरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे.
