साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
तरसोद ते फागणे बायपास महामार्गाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत (Black List) टाकावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तीव्र इशारा दिला आहे.
शासकीय निधीचा अपव्यय व नागरिकांच्या जीवाला धोका
उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तरसोद-फागणे बायपास महामार्गावर लोहमार्ग क्रॉसिंग असून येथे दररोज अवजड व प्रवासी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. असे असतानाही संबंधित ठेकेदाराने तांत्रिक निकष व करारातील अटी धाब्यावर बसवून अत्यंत दर्जाहीन काम केले आहे. या निकृष्ट कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय तर होतच आहे, शिवाय भविष्यात येथे मोठा अपघात घडल्यास नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी: स्वतंत्र व निष्पक्ष समितीमार्फत रस्त्याची प्रयोगशाळेत तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
ठेकेदारावर फौजदारी गुन्हा व ब्लॅकलिस्ट: दोषी आढळल्यास ठेकेदारावर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे.
अधिकारी-अभियंत्यांवर कारवाई: काम तपासून न घेणाऱ्या व देखरेखीत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अभियंत्यांवर विभागीय व शिस्तभंगाची कारवाई करावी.
आंदोलनाचा आणि कायदेशीर कारवाईचा इशारा
या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कठोर पावले न उचलल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा, तसेच सक्षम न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
प्रधिमुख पदाकाऱ्यांची उपस्थितीनिवेदन देताना मनसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, उप तालुकाध्यक्ष शैलेश चौधरी, राहुल चव्हाण, सुनील सोनवणे, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळ, चेतन पाटील तसेच ठाकरे गटाचे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोद घुगे, प्रमोद सोनवणे, गणेश पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, लोटन सोनवणे, राजेंद्र पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
