साईमत भडगाव प्रतिनिधी
टिटवी येथील प्राथमिक आश्रम शाळेत १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमातून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निलेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा देत शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी शरद देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी समाज उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तर अशोक देवरे यांनी आपल्या मनोगतातून आंबेडकरांच्या विचारसरणीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण आणि गीत सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे यंदा जयंतीनिमित्त अनावश्यक खर्च टाळून महिंदळे येथील पंचशील मित्र मंडळ आणि स्थानिक रहिवासी शरद खैरनार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाला गोपाळ देवरे, शरद गायकवाड, संजय देवरे, अर्जुन देवरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जितेंद्र बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
