जळगाव, चाळीसगाव व भडगावमधील ५० हून अधिक लिपिक संपात सहभागी; वाहनधारकांची गैरसोय वाढली
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अंतर्गत कार्यरत लिपिक संवर्गातील ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाल्याने परिवहन विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. जळगाव, चाळीसगाव आणि भडगाव येथील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने नागरिकांना विविध सेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असून कार्यालयीन कामकाजाची गती मंदावली आहे.
मंगळवारी सकाळपासून आरटीओ कार्यालयातील अनेक सेवा खिडक्या बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे वाहन परवाना नूतनीकरण, वाहन नोंदणी, मालकी हक्क हस्तांतरण, नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. अनेकांना आवश्यक कामे प्रलंबित ठेवावी लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यालयातील नियमित कामकाजावर ताण निर्माण झाला आहे. परिणामी अधिकारी वर्गाला अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळत नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला असून त्याला जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र संप किती काळ चालणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने वाहनधारक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
