जामनेर (जळगाव):
जामनेर तालुक्यातील शहापूर गावातून एक अंगावर काटा आणणारी आणि तितकीच अभिमानास्पद घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना अचानक एका हिंस्त्र बिबट्याने तरुण शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला चढवला. मात्र, या संकटाने जराही न डगमगता या धाडसी तरुणाने थेट बिबट्याशीच दोन हात केले. केवळ स्वतःचा जीवच वाचवला नाही, तर त्या हिंस्त्र बिबट्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्याचे अद्वितीय धाडस दाखवले आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या तरुण शेतकऱ्याच्या धैर्याचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथील मुकेश नाना डोंगरे हे तरुण शेतकरी आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. दरम्यान, शेतात आधीच दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने अचानक मुकेश यांच्यावर झडप घातली. या अनपेक्षित आणि भीषण हल्ल्यात मुकेश डोंगरे हे गंभीर जखमी झाले.
रक्ताच्या थारोळ्यातही बिबट्याशी जीवघेणी झुंज!
बिबट्या समोर असताना अनेकदा भल्याभल्यांची गाळण उडते, मात्र मुकेश यांनी प्रसंगावधान राखत जीवाची बाजी लावली. अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी बिबट्यावरील आपली पकड ढीली होऊ दिली नाही. मुकेश यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने अखेर त्या हिंस्त्र बिबट्याला जागेवरच जिवंत जेरबंद करण्यात यश आले. यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या जीवघेण्या लढाईत मुकेश डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जामनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
मुकेश डोंगरे यांनी दाखवलेल्या या अद्भूत धाडसामुळे परिसरात होणारा एक मोठा अनर्थ टळला आहे. एका हिंस्त्र प्राण्याशी प्रत्यक्ष झुंज देत त्याला जिवंत पकडण्याच्या या ऐतिहासिक हिमतीची चर्चा सध्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रंगली आहे.
